श्री महादेव रूद्राभिषेका महत्वपूर्ण माहिती....
कलीयुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच, आपल्या वास्तुतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी, श्रीशिवाचे आशिर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला ”रुद्र अभिषेक” हे प्रभावी अनुष्ठान आहे व रूद्राभिषेक अभिषेक श्री महादेवाला वर्षातून एक तरी करावा.
अभिषेक :
अभिषेकाचा अर्थ असतो स्नान करणे किंवा करविणे. रुद्र अभिषेक पंचामृत पूजा मंत्र उच्चारणा बरोबर देवाला अर्पण करतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रुद्र अभिषेकामुळे समृद्धी होते. सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो.
श्री शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक
श्री गुरूचरित्रा मध्ये रूद्र अभिषेकाचे महत्त्व सांगितले आहे
आ . ३४ नुसार पुढील प्रमाणे
श्री गुरुनृसिंहसरस्वती त्या ब्राम्हण पतिपत्नीला म्हणाले, "पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षमहिमा सांगून त्याच्या पुत्राचे व प्रधानपुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले. ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. पराशारांच्या चरणांवर लोटांगण घालून तो म्हणाला, "मुनिवर्य, माझ्या पुत्राचा पूर्वजन्मवृत्तांत तुम्ही सांगितलात. गतजन्मी माझा पुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक हे दोघे कुक्कुट-मर्कट होते. त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. त्या केवळ अजाणतेपणे घडलेल्या पुण्याईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत. मुनिवर्य, आपण त्रिकालज्ञानी आहात, सर्वत्र आहात, तेव्हा माझ्या एकुलत्या एका पुत्राचे भविष्य सांगा. माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करावी.
राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले, थोडा विचार केला. मग ते राजाला म्हणाले, "राजा, मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू असले तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःखसागरात बुडून जाल, याची कल्पना आहे; परंतु सत्य काय आहे ते सांगितले पाहिजे. नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल. तुझी ऐकण्याची तयारी आहे ना ?" राजा म्हणाला, "भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट असेल ते टाळता येईल अशा आशेने मी विचारीत आहे. जे असेल ते सांगा." पराशर म्हणाले, "मग ऐक तर ! तुझा हा मुलगा अल्पायुषी आहे. तुझ्या पुत्राला बारा वर्षे झाली आहेत. आजपासून सातव्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल." पराशारांचे हे शब्द भद्र्सेनाला वज्रघातासारखे वाटले. तो एका-एकी बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला. तो पराशारांचे पाय पाय धरून विनवण्या करू लागला, "मुनिवर्य, मला या दुःखापासून वाचवा. काहीही करून माझ्या मुलाचा अकाली मृत्यू टाळा."
राजाचा तो शोक पाहून पराशारांना त्याची दया आली. ते भद्र्सेनाला समजावीत म्हणाले, "राजा, असा धीर सोडू नकोस. या संकटावर मात करायची असेल, तर त्या शूलपाणि शिवशंकराला शरण जा.त्याची आराधना कर. त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली. ब्रम्हदेवांनी विश्व निर्माण करावे यासाठी स्वतःच शंकरांनी ब्रम्हदेवाला चारी वेदांचा उपदेश केला. या चारी वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय, हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे.असे स्वतःच शंकरांनीच सांगितले आहे. त्या शंकराच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्रध्यायी प्रार्थनेचा सतत पाठ करणे. या रुद्रध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने, परमश्रद्धेने श्रवण-पठण करतील त्यांच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील. हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रम्हदेवांना सांगितला. ब्रम्हदेवांनी इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला. त्या शतरुद्रियापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही. सर्व पापे, अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारा व चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे. कामक्रोधादी विकारांपासून घडणारी सर्वप्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात. रुद्राचा पाठ करणाऱ्याच्या समोर येण्याससुद्धा यमदूत घाबरतात.
मात्र हा रुद्राचा जप, गर्वाने, उभे राहून, निजून, अपवित्रपणे श्रद्धेशिवाय करू नये. रुद्राभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात त्यांना पापे शिवत नाहीत.रुद्र म्हणून शिवपूजन करणारा शतायुषी होतो. मी तुला एक उपाय सांगतो, तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल. गंडांतर टळेल. यासाठी भगवान शंकरांवर दहा हजार रुद्रावर्तनांनी अभिषेक कर, शंभर घटांची स्थापना कर. त्यात दिव्यवृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याने मुलावर सिंचन कर. नित्य दहा हजार रुद्रावर्तने कर. त्याला तीर्थ प्राशन करू दे म्हणजे तुझा मुलगा दहा हजार वर्षे जगेल."
पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राम्हणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरु केले. शंकरावर अभिषेक सुरु केला. त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले. हे रुद्रानुष्ठान अखंड सात दिवस चालू होते. सातव्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुध्द पडला. ते पाहताच पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले. ब्राम्हणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्याच्यावर टाकल्या. त्यावेळी सूक्ष्मरूपाने तेथे आलेले यमदूत राजपुत्राच्या जवळ येऊ शकले नाहीत. त्यांनी यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळी दंडधारी शिवदूत तेथे आले. त्यांनी यमदूतांना झोडपून काढून पळवून लावले. त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आला. ते पाहून भद्रसेनच्या डोळ्यांतून आनादाश्रू वाहू लागले. पराशारांना आनंद झाला. ते राजाला म्हणाले, "राजा, आपण जिंकलो. तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे गंडांतर गेले. " मग त्यांनी सुधार्माला विचारले, "बाळा, जे काही झाले त्यातले तुला काही आठवते का ? " सुधर्म म्हणाला, "एक महाभयंकर काळपुरुष मला पकडून नेण्याच्या बेतात होता. त्याचवेळी चार दिव्य पुरुष धावत आले. ते दोघेही शिवशंकरासारखे दिसत होते. त्यांनी त्या काळपुरुषापासून माझी सुटका केली." हे ऐकताच राजा भद्रसेन भगवान शंकरांचा जयजयकार करू लागला.
नगरात सगळीकडे आनंदोत्सव सुरु झाला. राजाने भरपूर दानधर्म केला. सर्व ब्राम्हणांना भोजन व दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पराशारांना महासनावर बसवून त्यांचा मोठा सन्मान केला. त्याचवेळी नारदमुनी तेथे आले. राजाने त्यांचा सन्मान करून विचारले. "मुनिवर्य, आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करता, तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का ?"
नारदमुनी म्हणाले, "मी कैलासलोकी गेलो होतो. त्यावेळी यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. "माझ्या दूतांना शिवदूतांनी पिटाळून का लावले ?" असे यमाने विचारले असता वीरभद्र त्याला म्हणाला, "तू भद्रसेनच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास ? त्याला दहा हजार वर्षांचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. हे तुला माहित नाही का ? तू आपल्या मर्यादा का सोडल्यास ? चित्रगुप्ताकडे काय नोंद आहे ती पहा. " मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला , तेव्हा चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला, 'येथे या राजपुत्राला बारा वर्षे आयुष्य आहे असे लिहिले आहे हे खरे. मोठेच गंडांतर आहे, पण नंतर तेथेच 'मोठ्या पुण्याईने व रुद्रानुष्ठानाने ते गंडांतर चुकवून हा दहा हजार वर्षे राज्य करील असे लिहिले आहे." हे ऐकताच यम वीरभद्राला नमस्कार करून निघून गेला. या पराशरांच्या सामर्थ्याने व रुद्रानुष्ठानाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही किंकले आहे." असे सांगून नारदमुनी 'नारायण नारायण' म्हणत आकाशमार्गाने निघून गेले. पराशरांनीही राजाचा निरोप घेतला.
त्या ब्राम्हण पतिपत्नीला हि कथा सांगून श्रीगुरू नृसिंहसरस्वती म्हणाले, "रुद्रानुष्ठानाचे व रुद्राक्ष धारण केल्याचे माहात्म्य असे मोठे अद्भुत आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, म्हणून तर श्रीगुरुंचे रुद्रावर फार प्रेम आहे. श्रीगुरू रुद्रस्वरूप आहेत म्हणून रुद्रध्यायाने त्यांची पूजा करावी."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'रुद्राध्याय माहात्म्य' नावाचा अध्याय चौतिसावा समाप्त असे महत्त्व रूद्राभिषेका चे आहे.
जय शंकर !
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.
कृपया संपूर्ण मजकूर देणगी विभागात वाचावा आणि सहकार्य करावे.